जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नगराध्यक्षाशी संबंधित मुद्द्यावर चर्चा

"काल रात्री मुख्यमंत्र्यांशी झालेली माझी भेट ही केवळ माझ्या विधानसभा मतदारसंघातील एका नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाशी संबंधित मुद्द्यावर होती. या भेटीदरम्यान इतर कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही..." असं जयंत पाटील म्हणाले.

पाच ते सात मिनिटे चर्चा झाली

 "काही दिवसांपूर्वी, उरण-इस्लामपूर मतदारसंघात सुमारे 7000 मतांच्या फरकाने निवडून आलेल्या नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्यात आले होते. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असल्याने, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांची भेट घेतली असता, त्यांना या परिस्थितीची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले; मात्र यावर निर्णय घेण्याचे आणि संबंधित व्यक्तीला अपात्र का ठरवण्यात आले, याची माहिती दोन दिवसांत मिळवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाच ते सात मिनिटे ही चर्चा झाली आणि त्यानंतर मी तिथून निघून आलो." असंही त्यांनी पुढे सांगिलतं.

पक्षविलिनीकरणाशी संबंध जोडणे चुकीचे

    जयंत पाटील यांनी पुढे सांगितले की, या भेटीचा कोणत्याही राजकीय समीकरणाशी किंवा पक्षविलिनीकरणाशी संबंध जोडणे चुकीचे आहे. त्यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या अफवा आणि तर्क-वितर्कांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.