जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर भेट दिली. दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील त्याच वेळी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विलीनीकरण जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांतील प्रमुख नेते एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने त्यांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने दोन्ही गटांमध्ये संवाद सुरू असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता विविध पक्षांकडून नव्या राजकीय रणनीती आखल्या जात असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांची एकत्र उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
जयंत पाटील हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात, तर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अजित पवार गटातील प्रमुख निर्णयक्षम नेते आहेत. त्यामुळे या बैठकीकडे केवळ औपचारिक भेट म्हणून न पाहता, त्यामागे महत्त्वाच्या राजकीय घडामोड घडू शकते. दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यालयाकडून या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत विलीनीकरणासंदर्भात दुजोरा देण्यात आलेला नाही.
माहितीनुसार, बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा झाली. 2023 मध्ये झालेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागली गेली होती. त्यानंतर अनेकदा दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा झाली, मात्र त्याला अधिकृत स्वरूप मिळाले नाही. आता वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीमुळे या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.
एनडीएला पाठिंब्याच्या चर्चाही
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएला पाठिंबा देऊ शकते, अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. माहितीनुसार, या पार्श्वभूमीवरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणत्याही पक्षाकडून किंवा संबंधित नेत्यांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.या बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालय, शरद पवार गट किंवा अजित पवार गटाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण झाल्यास शरद पवार गटाचा एनडीएला पाठिंबा मानला जाणार आहे.
