डिजिटल डेस्क, नवी दिल्ली: ओमानच्या किनाऱ्याजवळ, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय खलाशी हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे.
आपल्या मृत्यूपूर्वी काही काळ आधी, हेरंब करमरकर यांनी आपल्या कुटुंबीयांना एक संदेश पाठवला, ज्यात जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कळवले होते. पुण्यातील सागरी अभियंता असलेल्या हेरंब यांचा आपल्या कुटुंबीयांशी झालेला हा शेवटचा संवाद होता.

जहाजावर होते अनेक भारतीय
GFX Galaxy या व्यापारी जहाजावर अनेक भारतीय होते आणि हल्ल्यानंतर त्यापैकी काही जण बेपत्ता झाले. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की, जहाजावरील 10 भारतीयांना वाचवण्यात आले असून, एक जण अद्याप बेपत्ता आहे. बुधवारी, हेरंबच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली.
हेरंबच्या सासऱ्यांनी सरकारला हेरंबचा मृतदेह सुरक्षितपणे सुपूर्द करून त्याला मायदेशी आणण्याची विनंती केली आहे. भारताने या हल्ल्याचा निषेध केला असून व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
'एक्स' या सोशल मीडिया साइटवरील एका पोस्टमध्ये, ओमानमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, ते ओमानचे अधिकारी, जहाजाचे व्यवस्थापन आणि इतर संबंधित घटकांच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत केली जात आहे.
संपूर्ण कुटुंबावर शोककळा
हेरंब करमरकर हे व्यापारी जहाजावर मरिन अभियंता म्हणून कार्यरत होते. ते अवघ्या 30 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र परदेशात नोकरी करत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी साधला कुटुंबियांशी संवाद
होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी नौकेवर झालेल्या हवाई हल्ल्यात पुण्यातील अभियंता आणि मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेले हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्यापूर्वी हेरंब यांनी आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्यांचा कुटुंबीयांशी झालेला तो अखेरचा संवाद ठरला, ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. हेरंब करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
