जेएनएन, मुंबई. Marathi Bhasha Din 2025 News Update: राज्यभरात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. मुंबईत विविध संस्थांनी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेटवे ऑफ इंडिया व इतर ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभर विशेष कार्यक्रम, पुरस्कार वितरण, व्याख्यान आणि सत्कार यांचा धडाका पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकार, मुंबई महापालिका आणि विविध संस्थाकडून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी योगदान देत आहे.

27 फेब्रुवारीला करतात मराठी भाषा गौरव दिन साजरा

भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जादेखील मिळाला आहे. यावरूनच हे सिद्ध होते की, मराठी भाषा ही प्राचीन आणि समृद्ध अशी भाषा आहे. जगभरात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेचे महत्त्व विषद करणारे अनेक कार्यक्रम या दिवशी जगभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मराठीतील सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

    एवढ्या जगात माय मानतो मराठी..

    मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!, असं ट्वीट करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    हेही वाचा - Marathi Language day 2025: मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिवस कधी साजरा केला जातो? यातील फरक तुम्हाला माहिती आहे का ?

    एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक तसेच ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलेले मराठी भाषेतील अग्रगण्य कवी पद्मभूषण वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी  शतश: प्रणाम.... मराठी भाषा गौरव दिवसाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं ट्वीट करत एकनाथ शिंदे यांनी मराठी जणांना शुभेच्छा दिल्या आहे.

    हेही वाचा - Marathi Language Day 2025: राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा;अनेक ठिकाणी मराठी भाषेचा जागर,तर पुस्तक प्रदर्शनचे आयोजन

    अजित पवारांनी केलं आवाहन

    आपली मायमराठी अंगी उतरवा, मनी जपा, स्वाभिमान बाळगा, तिचा सन्मान करा असं आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातूनच आपल्या संस्कृतीचं संवर्धन होणार आहे, मानवी विचारांची देवाणघेवाण होणार आहे. भाषेच्या लौकिकतेत भर पडणार आहे, असं पवार म्हणाले.

    हेही वाचा - Vidarbha Vs Kerala Ranji Trophy 2025: विदर्भानं 300 धावा केल्या पार, केरळ विकेटच्या शोधात