जेएनएन, मुंबई. marathi language day 2025:मराठीत अनेक मोठे साहित्यिक होऊन गेले, ज्यांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला एका वेगळ्या उंचीवर नेले. त्यातलेच एक प्रसिद्ध साहित्यिक म्हणजे कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज, ज्यांचा जन्मदिवस आज आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. कवी कुसुमाग्रज हे त्यांच्या मूळ नावापेक्षा त्यांच्या टोपण नावानेच ओळखले जातात. कुसुमाग्रजांना त्यांच्या लेखनासाठी अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मराठी साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्कारानेदेखील त्यांना गौरविण्यात आले होते. अशा या महान साहित्यिकाचा जन्मदिवस आज आपण साजरा करत आहोत.

कुसुमाग्रज
नाशिक येथे जन्मलेल्या कुसुमाग्रज यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांना काका वामन शिरवाडकर यांनी दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे करण्यात आले. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते व कामानिमित्त ते पिंपळगावात वास्तव्यास होते. कुसुमाग्रजांना सहा भाऊ व एक धाकटी बहीण होती, जिचे नाव कुसुम. सहा भावांमध्ये एकुलती एक असलेली कुसुम विष्णू यांचीदेखील लाडकी होती. त्यांनी कुसुमचा अग्रज म्हणजेच मोठा भाऊ म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव धारण केले व संपूर्ण साहित्य ते कुसुमाग्रज याच नावाने लिहीत असत. हेच नाव त्यांची ओळख बनले.

साहित्यसंपदा
कुसुमाग्रज यांनी मराठीतून 16 कविता खंड, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा खंड, सात निबंध खंड, 18 नाटके आणि सहा एकांकिका लिहिल्या. त्यांना 'नटसम्राट' या नाटकासाठी 1974 चा साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण (1991) आणि 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कुसुमाग्रज यांनी 1964 मध्ये मडगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.

कुसुमाग्रज: साहित्यिक, अभिनेते आणि पत्रकार
कवी कुसुमाग्रज यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1936 मध्ये गोदावरी सिनेटोन लिमिटेडमध्ये सामील झाल्यानंतर 'सती सुलोचना' या चित्रपटाची पटकथा लिहिली होती व याच चित्रपटात लक्ष्मणाची भूमिकादेखील साकारली होती. तसेच, 'साप्ताहिक प्रभा', 'दैनिक प्रभात', 'सारथी', 'धनुर्धारी' आणि 'नवयुग' यांसारख्या नियतकालिकांमध्ये लेखन केले. पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी 1946 ते 1948 पर्यंत 'स्वदेश' नावाचे साप्ताहिकदेखील संपादित केले. कुसुमाग्रज यांनी 1943 नंतर ऑस्कर वाइल्ड, मोलिएर, मॉरिस मेटरलिंक आणि शेक्सपियरसारख्या दिग्गज साहित्यिकांच्या नाटकांचे, विशेषतः त्यांच्या शोकांतिकांचे रूपांतर करण्यास सुरुवात केली.

पुरस्कार
कुसुमाग्रज यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

  • कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल भारतातील एक प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्काराने 1987 साली सन्मानित करण्यात आले.
  • तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने 1991 साली सन्मानित करण्यात आले.
  • किंग लिअरचे रूपांतर 'नटसम्राट' नाटक लिहिण्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 1974 साली प्रदान करण्यात आला.