मुंबई (एजन्सी) - Maratha quota protest : दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जवळील रस्त्यांवर शुक्रवारी हजारो मराठा आरक्षण आंदोलक जमल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

हजारो संख्येने मराठा बांधव आझाद मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर उतरल्याने वाहतूक कोंडी झाली. आझाद मैदानावर आजपासून मनोज जरंगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.  लोकांच्या गर्दीमुळे सकाळच्या वेळेत बेस्ट बसेस आणि इतर वाहने 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पुढे जाऊ शकली नाहीत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सीएसएमटी परिसरात धाव घेतली आणि जरांगे यांच्या समर्थकांना रस्ते मोकळे करून वाहनांना वाट मोकळी करून देण्याचे आवाहन केले. आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, पनवेल-सायन रोड, व्हीएन पुरव रोड, ईस्टर्न फ्रीवे, पी डी'मेलो रोड, वालचंद हिराचंद मार्ग, डॉ. दादाभाई नौरोजी रोड आणि हजारीमल सोमाणी रोड हे आपत्कालीन सेवा वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहन वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी जरांगे यांना २९ ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत आझाद मैदानावर शांततापूर्ण निदर्शने करण्याची परवानगी दिली आहे.  सायंकाळी 6 वाजता, सर्व निदर्शकांना घटनास्थळ सोडावे लागेल, असे पोलिसांनी सांगितले.जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आझाद मैदानात 1500 हून अधिक मुंबई पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथेही सुरक्षा वाढवण्यात आली आहे, जिथे महाराष्ट्राच्या दुर्गम भागातून मराठा आंदोलक आले आहेत.