मुंबई - मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन आता थेट राज्याच्या राजधानीत दाखल झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. कपाळाला गुलाल लागल्याशिवाय आपण या मैदानावरून उठणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी जाहीर केली आहे.
जरांगे पाटलांसोबत साडेसहा हजारांहून अधिक गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल झाला आहे. समर्थक मराठा बांधव आझाद मैदानावर मोठ्या संख्येने जमले आहेत. सरकारने गोळ्या घातल्या तरी आपण मागे हटणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला. मात्र, आंदोलनादरम्यान समाजाच्या नावाला गालबोट लागेल असे कृत्य कोणीही करू नये, असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.
सरकारबद्दल कृतज्ञता आणि संवादाची तयारी -
सरकारने आतापर्यंत आंदोलनाला दिलेल्या सहकार्याबद्दल मनोज जरांगे यांनी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच, आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण चर्चेसाठी नेहमीच तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभरात अनेक आंदोलने झाली आहेत. यापूर्वी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात काढण्यात आलेल्या मोर्चांना व्यापक प्रतिसाद मिळाला होता. परंतु या वेळेस आंदोलन थेट मुंबईत नेल्याने सरकारवर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. सरकार पुढील काही दिवसांत कोणता निर्णय घेते आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.