जेएनएन, मुंबई. Mahavikas Aghadi Mumbai Morcha : मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी तसेच निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज ( शनिवार) महाआघाडीकडून मुंबईत भव्य मोर्चा काढला जाणार आहे. 'सत्याचा मोर्चा' असे या मोर्चाचे नामकरण करण्यात आले आहे. या मोर्चात काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी गट, उद्धव ठाकरे गट, मनसे यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, आणि अन्य संघटना सहभागी होणार आहेत. दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रिटवरून या मोर्चांची सुरूवात होणार असून मेट्रो सिनेमाच्या समोरून तो महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबेल. तेथे प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहे.
मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून आज (1 नोव्हेंबर) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चानिमित्त मनसे प्रथमच महाविकास आघाडीसोबत आंदोलनात उतरत आहे. या मोर्चाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीतील गैरव्यवहाराबाबत सामान्य लोकांना सत्य कळावं, आपले मत जातं कुठे हे जनतेला समजावं यासाठी या मोर्चांचे आयोजन करत निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे.
या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे सहभागी होणार आहेत. यासाठी ते दादरहून सीएसएमटीपर्यंत लोकलने प्रवास करणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी कार्यकर्ते मेळावे घेऊन या मोर्चाबद्दल वातावरण निर्मिती केली आहे. या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात महाविकास आघाडी व मनसेची एक बैठकही पार पडली होती व त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मतदार यादीतील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुकांना विरोध राहील, यावर विरोधकांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले होते. रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मतदारयंत्र, मतदार याद्यांसंदर्भात प्रेझेन्टेशन करून जनजागृती केली होती. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनीही याबाबत सादरीकरण करून वातावरण ढवळून काढले आहे. मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन शिवसेना व मनसेकडून मुंबईकरांना केलं आहे.
कोणत्या मांगण्यासाठी आजचा मोर्चा?
- मतदारयाद्यांतील दुबार नावे काढून टाकणे.
- मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका घेऊ नये
- सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा
- मतदारयाद्या अद्ययावत करणे.
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोर स्टेज उभारण्यात आले असून येथे महाआघाडीतील नेत्यांची भाषणे होणार आहेत. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील. या मार्चाला शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत.
निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार -
राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मतदार याद्यांतील गोंधळ व बोगस मतदारांचा घोळ दूर करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती महाआघाडीतील सूत्रांनी दिली आहे.
