जेएनएन, मुंबई. Raj Thackeray on Uddhav Thackeray Meeting : - महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभे करण्याच्या सरकारच्या घोषणेवरून राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच झापलं. मुख्यमंत्री होण्यासाठी किती लाचार व्हायचं, असा विचार मनाच येतोच कसा? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने राज्य सरकारकडून गड किल्ल्यांवर नमो टुरिझन सेंटर उभारले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यावरून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदे आणि नमो टुरिझन सेंटरबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, आपण आपला स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा? यांच्या मनात हा विचार येतोच कसा? गुरुवारी मुंबईत मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.
टुरिजम सेंटर फोडण्याचा इशारा -
राज ठाकरे म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग महाराष्ट्रात पर्यटनाचे स्पॉट काढत असून त्या केंद्रांना नमो टुरिझम सेंटर्स देणार आहे. याचा जीआर निघाला आहे. बर तर ही केंद्र कोठे उभारली जाणार आहे, तर शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर.. जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे तिथे हे नमो टुरिजम सेंटर काढायला निघाले आहेत. मी आता सांगतोय. किल्ल्यांच्या वर नाही, खाली नाही, आजूबाजूला असो, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी -
राजकीय पक्षांना सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिल्याबद्दल निवडणूक आयोगावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर पचवणे कठीण आहे. देशात जे काही घडत आहे ते एका प्रामाणिक मतदाराचा अपमान आहे. निकाल म्हणजे मतदाराने दिलेल्या मतांचा अपमान आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, असे ठाकरे म्हणाले, कोणत्याही विकसित देशात ईव्हीएम नाहीत.
उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत काय म्हणाले राज ठाकरे?
चुलत भाऊ उद्धव यांच्याशी वारंवार होणाऱ्या भेटींबद्दल ठाकरे म्हणाले, उद्धव यांच्याशी भेटी आणि संवाद होत राहतील. दोन्ही पक्षांनी समेटाचे पुरेसे संकेत दिले असले तरी, त्यांनी अद्याप अधिकृतपणे युतीची घोषणा केलेली नाही.
