मुंबई - Raj-Uddhav Thackeray Morcha : खोट्या मतदार याद्यांविरोधात राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी उद्या मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे महाआघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक व्यवस्थेवर होणारा ताण लक्षात घेऊन मोर्चाला परवानगी नाकारल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, पोलिसांनी आयोजकांना मोर्चा न काढता निवडणूक आयोगाकडे प्रतिनिधीमंडळाद्वारे निवेदन द्यावे, अशी सूचना केली आहे.माविआच्या नेत्यांनी पोलिसांच्या निर्णयावर तीव्र नाराजी  व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आमचा हक्क पोलिसांनी हिरावून घेतला आहे. आम्ही शांततेत मोर्चा काढणार होतो.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी या मोर्चावर थेट इशारा दिला आहे. परवानगीविना कोणी मोर्चा काढला, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग झाल्यास कठोर कारवाई होईल, असा थेट इशारा भाजपने दिला आहे. मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय आंदोलन करणे हे गुन्हा आहे. असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलिसांकडून याबाबत कायदा-सुव्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला असून, उद्या सकाळपासून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलिस तैनात केले जाणार आहेत. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी मोर्चा रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.