जेएनएन, मुंबई. राज्यात मृगशीर्ष नक्षत्र 8 जूनपासून लागले आहे. अद्यापही महाराष्ट्रात पाहिजे तसा पाऊस पडत नाही आहे. मान्सून (Monsoon 2026) कोकण परिसरात रेंगाळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्या कधी कराव्या असा प्रश्न सतावत आहे. अनेकांचे लक्ष्य आभाळाकडे लागले आहे. आज अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वारे आणि उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात या ठिकाणी पावसाचा अलर्ट 

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्र नुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात वादळी वाऱ्यासह उष्णतेचा अलर्ट देण्यात आलेला आहे. 

  • मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 
  • पावसाचा अलर्ट - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 
  • उष्णतेचा अलर्ट - अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ,

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

मृग नक्षत्राचे पहिले सत्र संपत आले आहे. तरी राज्यात जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पेरण्या अद्याप न करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी पेरण्याला सुरुवात केली आहे. मान्सून पूर्व पावसाने काही ठिकाणी दिलासा दिला असला तरी मान्सूनचा पाऊस आला नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. 

मान्सून कधी व्यापणार संपूर्ण महाराष्ट्र

    पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातील इतर भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई आणि कोकणवासीयांसाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे आहेत. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सध्या मान्सून महाराष्ट्रातील सोलापुरात दाखल झालेला आहे.