जेएनएन, मुंबई. मान्सूनचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 24 तास पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट-
हवामान विभागाने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागांसाठी मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये पुढील 24 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूस्खलन, दळणवळणात अडथळे आणि नदी-नाल्यांना पूर येण्याचा धोका वाढू शकतो.
मराठवाड्यात दमदार हजेरी -
28 ते 31 ऑगस्टदरम्यान मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या काळात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे हवामान खात्याने आवाहन केले आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्र अलर्ट -
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या उत्तर-मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. काही ठिकाणी तुरळक सरींमुळे शेतीसाठी लाभदायी हवामान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोकणात ढगाळ वातावरण-
दक्षिण कोकण ते गोव्याच्या सीमेपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती आहे. रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची तीव्रता तुलनेने कमी असेल, परंतु आकाश ढगाळ राहणार असून अधूनमधून सरींची शक्यता आहे.