जेएनएन, मुंबई/पुणे: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट (Red Alert in Maharashtra) जारी केला आहे.
या भागात रेड अलर्ट जारी
रायगड आणि पुणे घाट परिसराला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सातारा घाट या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकण भागातील अनेक शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी आकाश ढगाळ राहील. तसेच मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
NDRF आणि SDRF ला अलर्ट!
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे की, NDRF आणि SDRF च्या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि पाणी साचणे अशा आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी स्थानिक यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे अशी माहिती दिली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून पाऊस पूर्णपणे माघारी फिरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या वर्षी पावसाने 24 जूनला केरळमधून भारतात प्रवेश केला होता, तर 29 जूनला संपूर्ण देश व्यापला होता. काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पावसाने शनिवारपासून पुन्हा मुंबईसह महाराष्ट्रात हजेरी लावली आहे.