जेएनएन, मुंबई. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला (weather update today) आहे. मुंबई, रायगडसह ठाण्याला पुढील तीन तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पावसाची स्थिती जाणून घेऊया.
सांगलीत मुसळधार पाऊस
सांगली जिल्ह्यात दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासात सरासरी 12.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 33.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जायकवाडीतून विसर्ग
मराठवाड्याची तहान भागवणारे छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण हे 100 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने नाथसागर तुडूंब भरला आहे.
मुंबईत रेड अलर्ट
भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगर प्रदेशात पुढील 3 तासांसाठी पावसाचा 'रेड अलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
Maharashtra | Red Alert issued for Mumbai, Thane and Raigad for 3 hours. Intense to very intense spells of rain and thunderstorm accompanied with lightning with gusty winds reaching 30-40 kmph very likely: IMD Mumbai pic.twitter.com/h6R0uOfaRq
— ANI (@ANI) September 15, 2025
हिंगोलीत अतिवृष्टी
हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 18.2 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, कळमनुरी तालुक्यातील वाकोडी (66 मि.मी.) आणि डोंगरकडा (79 मि.मी.) या दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील धरण प्रकल्प विसर्ग
- ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर
प्रकल्पाच्या 7 दरवाजातून 11800 क्युसेक्स विसर्ग - येलदरी प्रकल्प
विद्युत निर्मिती केंद्रातून 2700 क्युसेक्स विसर्ग - सिद्धेश्वर प्रकल्प
मुख्य व्दार 4935 क्युसेक्स विसर्ग
पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
आज दि. 15 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंजअलर्ट दिलेला असून पुढील 3 तासात आपल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हे जिल्हा प्रशासनाचे केले आहे.
पुणे जिल्ह्यात 15 सप्टेंबर रोजी थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात 100 ते 150 नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच PMRDA व NDRF ने बचाव करून सुमारे 50-55 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले-उर्वरित नागरिकांना सुरक्षित आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासन दिली आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग सुरु
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या विसर्गात सकाळी 10 वाजता 14 हजार 547 क्यूसेक करण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिली आहे.
वारणा धरणातून 4980 क्युसेकने विसर्ग
कोल्हापुरातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून वारणा धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे दिनांक 15/09/2025 रोजी सकाळी 9 वा. वक्र द्वाराद्वारे 3380 क्युसेक व विद्युत गृहातून 1630 क्युसेक विसर्ग असा एकूण 4980 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
राज्यात आज पावसाचा अलर्ट
रेड अलर्ट - मुंबई, रायगड, ठाणे,
ऑरेंज अलर्ट - पुणे घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर,
येलो अलर्ट - पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ,