जेएनएन, मुंबई. Maharashtra Rains Panchnama: राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.
पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा
मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्तक रहावे.
तातडीने पंचनामे करावेत
मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले की, शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत व दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने अतिवृष्टी, पुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत. या नुकसानीचा अहवाल संबधित विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावा, असेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! विहार तलाव ओव्हरफ्लो
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी एक असलेला विहार तलाव आज (18 ऑगस्ट 2025) दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी भरुन ओसंडून वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता 2,769.8 कोटी लीटर (27,698 दशलक्ष लीटर) इतकी आहे.