जेएनएन, मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. परभणी, हिंगोलीसह छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, बीड, धाराशीव या भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
खरीप हंगामाचे मोठे नुकसान
कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मका, डाळींब, द्राक्ष यासारख्या पिकांवर पावसाचा गंभीर फटका बसला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कंबर मोडली असून, उभ्या हंगामाचे मोठे नुकसान झाल्याची परिस्थिती आहे.
आमदारांची मागणी
या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विविध पक्षांच्या आमदारांनी राज्य सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. आज मुंबईत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भाजप आमदार रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे, राजेश विटेकर आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार राहुल पाटील यांनी भेट घेतली.
वसमत विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे.
— Raju Navghare (@RajuNavghareNCP) September 16, 2025
संदर्भात उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली.
त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित मदतीचे आश्वासन दिले. pic.twitter.com/Lf10gA7FjZ
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
या भेटीत आमदारांनी मराठवाड्यात ‘ओला दुष्काळ’ (Wet Drought) जाहीर करण्याची मागणी केली. अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाली असून, शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबले आहेत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे, गोठ्यांचे, शेततळ्यांचे आणि रस्त्यांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत आणि नुकसानभरपाई मिळावी, असे आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.