जेएनएन, मुंबई Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या तीन ते चार महिन्यांत दोघांनी तब्बल सात ते आठ वेळा गुप्त आणि औपचारिक अशा पद्धतीने भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांत दोन्ही बंधू सात ते आठ वेळा एकत्र आले आहेत. 20 वर्षे एकमेकांचं तोंड न पाहणारे दोन्ही भावांच्या मनोमिलनामुळे महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघालं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार म्हणजे राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने आपण राज ठाकरेंसोबत निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता उद्धव व राज महाआघाडीसोबत राहतात की शिवसेना व मनसेची युती करून एकत्र निवडणुकीला सामोरं जातात, हे पाहणं उत्सुकतेचे आहे.
20 वर्षे एकमेकांच्या विरोधात राजकीय रणांगणात उतरलेले ठाकरे बंधू आता पुन्हा जवळ येत आहेत.यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांसाठी एक मोठे वळण मानले जात आहे. दोन्ही भावांमधील मतभेद बाजूला ठेवत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं संकेत त्यांच्या भेटींतून मिळत आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत राजकीय युती करणार म्हणजेच मनसे महाविकास आघाडीत (मविआ) सामील होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या मविआ आघाडीत मनसेचा समावेश झाल्यास आगामी निवडणुका आणि विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या महानगरपालिका निवडणुकांमध्ये समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो.
काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याचा राज यांच्या समावेशाला विरोध -
राज ठाकरेंच्या संभाव्य प्रवेशावर काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. राज ठाकरे यांच्या भूतकाळातील भूमिकांमुळे आणि भाषणशैलीमुळे काँग्रेसच्या काही नेत्यांना मनसेसोबतची युती पसंत नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळले आहे. युतीच्या पुढील प्रक्रियेबाबत तणावाचं वातावरण आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटींनंतर राज ठाकरे यांच्या आडच्या भेटीला अधिकच महत्त्व आले आहे. माहितीनुसार, दिवाळीनंतर ठाकरे बंधू एकत्रित पत्रकार परिषद घेऊन मोठा राजकीय निर्णय जाहीर करू शकतात. ठाकरे बंधूंचं मनोमिलन हे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात “गेम चेंजर” ठरू शकते दोन्हींच्या एकत्र येण्याने मविआची ताकद वाढेल, तर महायुतीच्या गोटात मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
