जेएनएन, मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी एक महत्त्वाचा फॉर्म्युला ठरवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार, महायुती (Mahayuti) मुंबई महानगरपालिका आणि काही मोजक्या ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे. मात्र, उर्वरित महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहे.

महायुतीचा निवडणूक फॉर्म्युला ?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे तिन्ही घटकपक्ष भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या लढतील. मुंबईसारख्या उच्च प्रतीकात्मक आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत एकजुट दाखवणे आवश्यक असल्याचे महायुतीचे मत आहे.

दुसरीकडे, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे पक्ष आपापल्या ताकदीवर उमेदवार उभे करणार आहेत. निवडणूक निकालानंतर पुन्हा एकत्र येऊन सत्तास्थापनेसाठी आघाडी करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.

महायुतीमधील तीन पक्ष वेगवेगळे लढल्यास विरोधकांना विशेषतः महाविकास आघाडीला (MVA) त्याचा थेट फायदा होऊ शकतो.यामुळे महायुतीच्या नेत्यांना लक्षात आल्याने मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकत्र निवडणूक लढणार आहे. मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने एकत्रित लढाईचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील इतर ठिकाणी मात्र स्थानिक नेते, संघटनात्मक स्थिती आणि गटबाजी पाहता स्वबळावर लढण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

    निकालानंतर पुन्हा एकत्र!

    निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी निकालानंतर पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापनेची प्रक्रिया महायुती एकत्रितरित्या करेल, असा अंतर्गत समन्वय झाला असल्याची माहिती समोर आली आहे.