जेएनएन, मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडली. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाकडून कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक दिवसांपासून या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र अखेर पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत राजेंद्र जैन यांची राज्यसभा उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भुजबळांच्या नावाची जोरदार चर्चा
राज्यसभेच्या या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते.ओबीसी समाजातील प्रभावी नेतृत्व, दीर्घ राजकीय अनुभव आणि पक्षातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती.
दरम्यान, भुजबळ यांनी राज्यसभेत जाण्यासाठी एक अट ठेवली असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. आपण राज्यसभेत गेल्यास आपल्या पुतण्याला, माजी खासदार समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याची चर्चा होती. मात्र या संदर्भात पक्षाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाही.
कोअर कमिटीच्या बैठकीत अंतिम निर्णय
कोअर कमिटीच्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा झाल्यानंतर अखेर राजेंद्र जैन यांच्या नावाला सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आल्याचे समजते. पक्ष संघटन, निष्ठा आणि दीर्घकाळ केलेल्या कामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे.
राजेंद्र जैन हे पक्षातील अनुभवी नेते मानले जातात. संघटनात्मक कामकाज आणि पक्षविस्तारामध्ये त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांना ही संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
“भुजबळ नाराज नाहीत” : तटकरे
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, सुनील तटकरे यांनी त्याचे खंडन केले. “छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते आहेत. उमेदवारीबाबत पक्षाने सामूहिक निर्णय घेतला आहे. भुजबळ नाराज नाहीत,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
तसेच पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नसून सर्व नेते एकत्रितपणे पक्ष बळकटीसाठी काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
राजकीय चर्चांना पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात होते. भुजबळ, समीर भुजबळ आणि इतर इच्छुक नेत्यांच्या नावांची चर्चा रंगत असतानाच आजच्या बैठकीनंतर पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
