जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics: यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेचे काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचा दावा यावेळी शिंदे यांनी केला.

प्रवेश सोहळ्यात साहेबराव कांबळे यांच्यासह सूर्यकांता दिंडाळकर, राहुल वानखेडे, प्रफुल्ल खंदारे, विद्यानंद नलावडे, कैलास घोगरे, नामदेवराव शिंगणकर, पंजाबराव भालेराव, रवींद्र जाधव, संतोष चव्हाण यांच्यासह युवक काँग्रेस, महिला आघाडी, खरेदी-विक्री संघ आणि विविध संघटनांमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याच प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी यावेळी प्रवेश केला. त्यामध्ये उपनगराध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड-महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत तब्बल 93 हजार मते मिळविणारे साहेबराव कांबळे हे प्रभावी नेतृत्व असून त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
