जेएनएन, नवी दिल्ली. Mrug Nakshatra 2026: ‘मृग नक्षत्र’ हे आकाश मंडपातलं वैशिष्टयपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. सामान्यत: 7 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असे मानले जाते. मात्र, यंदा सूर्य 8 जूनला मृग नक्षत्रात प्रवेश करतोय.

मृग नक्षत्रात बेडूक वाहन

हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणाऱ्या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला ‘मृग लागले’ असे म्हणतात. प्रत्त्येक नक्षत्राचे विशिष्ट वाहन असते यंदा मृग नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. पंचांगानुसार, मृग नक्षत्रात बेडूक हे वाहन असणे म्हणजे चांगली पर्जन्यवृष्टी आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सूर्याचा मृगशीर्ष नक्षत्रात प्रवेश (राशीविषयी)

8 जून 2026 रोजी सूर्याचा मृगशीर्ष नक्षत्रात प्रवेश करत आहे. हे संक्रमण वृषभ आणि मिथुन या राशींमधून दोन टप्प्यांत पार पडेल. या संक्रमणाचे दोन मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा 8 जून 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत असेल, ज्यामध्ये सूर्य वृषभ राशीत स्थित असेल.

दुसरा टप्पा 15 जून 2026 रोजी सुरू होईल, जेव्हा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीतील सूर्याचे आगमन संवाद, नेटवर्किंग, शिकण्याची क्षमता आणि नवीन उपक्रम हाती घेण्याची जिद्द यांना चालना देते. हे संक्रमण मृगशिरा नक्षत्रात होत असल्याने, संपूर्ण महिना हा शोध आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्याच्या प्रक्रियेसाठी समर्पित असेल.

    'ही' 9 आहेत पावसाची नक्षत्रं

    सूर्याचा आकाशातील भासमान मार्ग म्हणजे क्रांतीवृत्त. याच पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या आकृत्यांना प्राचीन भारतीयांनी 27 नक्षत्रं म्हटलं आहे. या 27 नक्षत्रांपैकी मृग नक्षत्र, आद्र नक्षत्र, पुनर्वसू, उत्तरा नक्षत्र, पुष्य नक्षत्र, आश्‍लेषा नक्षत्र, मघा, पूर्वा नक्षत्र, उत्तरा नक्षत्र, हस्त नक्षत्र ही पावसाची नऊ नक्षत्रे आहेत.

    यंदाचा पावसाळा कधी सुरू होणार?

    मान्सून दरवर्षी मे च्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला केरळात पोहचतो. 7 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात येतो आणि जुलै महिन्यापर्यंत तो संपूर्ण देशात पडतो. यंदा एक दिवस पूर्वीच मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झाला आहे.