जेएनएन, मुंबई: मंत्रीपदाचा कार्यकाळ संपून 5 महिने उलटून गेले, तरी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयाजवळील ‘सातपुडा’ हा सरकारी बंगला (Satpuda bungalow) रिकामा केलेला नाही. मुंबईत स्वतःचे घर नसल्यामुळे सरकारी निवासस्थान सोडले नाही, असे स्पष्टीकरण मुंडे यांनी पूर्वी दिले होते.

मुंडे यांच्या नावावर एन. एस. पाटकर मार्गावर सदनिका 

मात्र, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुंडे यांच्या नावावर मुंबईतील गिरगाव चौपाटी लगत एन. एस. पाटकर मार्गावर असलेल्या ‘वीरभवन’ या 22 मजली इमारतीतील 22 व्या मजल्यावरील 902 क्रमांकाची आलिशान सदनिकेची नोंद आहे. ही सदनिका सध्या वापरात नसल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट आहे. 

डिसेंबर 2023 मध्ये मुंडे आणि त्यांची पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावावर 16 कोटी 50 लाख रुपयांना ही सदनिका खरेदी केली गेली. त्यातील 10 कोटी रुपये धनंजय मुंडे यांनी स्वतः खर्च केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मात्र, ही खरेदी झाल्यापासून आजपर्यंत या घरात कोणीही राहत नाही आणि ते बंदच असल्याचे सांगण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्या जवळीक असल्याच्या कारणावरून मंत्रिपदाच राजीनामा द्यावा लागला होता.

धनंजय मुंडे राजकीय कारकिर्द 

    • धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांचे काका, दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत केली. 
    • त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. 
    • 2009 साली गोपीनाथ मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आपली कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. 

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि प्रमुख पदे

    • 2012 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अजित पवार यांचे निकटचे सहकारी बनले. 
    • 2013 मध्ये त्यांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. 
    • 2014 ची निवडणूक: या निवडणुकीत त्यांनी परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला. 
    • 2019 ची निवडणूक: या निवडणुकीत त्यांनी पुन्हा पंकजा मुंडे यांना पराभूत करून मोठा विजय मिळवला. या विजयानंतर त्यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले.
    • महाविकास आघाडी सरकार: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये ते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री होते. 

    अजित पवार यांच्यासोबत

    • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. 
    • 2023 ते 2024: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. 
    • 2024: अलीकडेच, अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री होते. कथित प्रकरणांमुळे त्यांना या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

    हेही वाचा - Dadar Kabutar Khana: मुंबई कबूतरखाना प्रकरणी आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी!