जेएनएन, मुंबई. Dadar Kabutar Khana: मुंबईतील दादर येथील कबूतरखान्यांच्या संदर्भात आज (13 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कबूतरखाने बंद करण्याच्या आदेशाला राज्य सरकारने मान्यता दिली होती. परंतु काही संस्था आणि पक्षीप्रेमींनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले.
पूर्वीच्या सुनावण्यांमध्ये मुंबई हायकोर्टाने कबूतरखाने बंद ठेवण्याचा आदेश कायम ठेवला होता आणि कबूतरांना खाऊ घालणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, या प्रकरणात एक तज्ज्ञ समिती नेमण्याचे आदेशही दिले होते, जेणेकरून आरोग्यावर होणारा परिणाम आणि पर्यायी उपायांचा अभ्यास होऊ शकेल.
हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही काही ठिकाणी कबूतरांना खाऊ घालण्याचे प्रकार सुरूच राहिले, ज्यामुळे वातावरण तापले. या संदर्भातील वादात सर्वोच्च न्यायालयाचाही हस्तक्षेप झाला आहे. सर्वोच्य न्यायालयाने हाय कोर्टाचा आदेश कायम ठेवला आहे.
आजच्या सुनावणीत हायकोर्टात राज्य सरकारची भूमिका, तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि पुढील कारवाई यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.