जेएनएन, मुंबई. Dharavi Redevelopment Project: धारावी हे देशातील वैशिष्टपूर्ण उद्योग समूहांचे विस्तीर्ण क्षेत्र आणि महत्वाचे आर्थिक केंद्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन करत पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने विकास करावा, स्थानिक कारागिरांच्या, व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मूळ रहिवासी असलेल्या प्रत्येकाला घर द्यायचे

धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करावयाचा असून धारावीतील व्यावसायिक उलाढाल सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याला प्राथिमकता देत या ठिकाणच्या गुणवंत कारागिरांना, त्यांच्या कौशल्य आधारित विविध व्यवसायांच्या पुनर्वसनास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रत्येकाला घर द्यायचे आहे, असं फडणवीस म्हणाले. 

धारावीतील प्रत्येकाला पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे

धारावीमधील प्रत्येकाला पुनर्वसन प्रकल्पात न्याय मिळाला पाहिजे, येथील प्रत्येकजण या पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र असणार आहे, त्याचे निकष वेगवेगळे असतील, मात्र धारावीतील प्रत्येकाला पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे, याची खबरादारी घेण्यात यावी, असं त्यांनी सांगितलं.

स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन…

    ठरल्याप्रमाणे नियमानुसार, पात्र लाभार्थ्यांना विकासप्रकल्पात देय असलेली जागा देण्यात यावी. धारावीची मूलभूत व्यावसायिक ओळख जपून, मूळ वैशिष्ट्यांना सुरक्षित ठेऊन धारावी विकास प्रकल्पाची संकल्पना राबवावी. यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक तो समन्वय ठेवावा. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन लोकभावना जपून समन्वयपूर्वक विकासाची कामे करावीत, असे निर्देश ही फडणवीस यांनी दिले.