जेएनएन, मुंबई. Maharashtra Budget 2025: अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प 2025-26 सादर केला. यावेळी त्यांनी नुकतेच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसंच, दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची अजित पवार यांनी घोषणा केली.
भावफुलांना पायी उधळून
आयुष्याचा कापूर जाळुन
तुझे सारखे करीन पूजन,
गीत तुझे मी आई गाईन
शब्दोशब्दी अमृत ओतून
अशा मायमराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्यावतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो, असं अजित पवार म्हणाले.
3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन
यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल.
रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ
मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार
मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार आहेत.