जेएनएन, मुंबई: राज्यात घरगुती एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे (LPG Shortage in Maharashtra) निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना पर्याय मिळावा यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केरोसिन उपलब्ध करून देण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे.
नागरिकांना अडचणीतून दिलासा देण्यासाठी
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधिमंडळाच्या अधिवेशनात यासंदर्भात निवेदन सादर केले. राज्यातील अनेक भागांत एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अडचणीतून दिलासा देण्यासाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केरोसिनचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय
भुजबळ यांनी सांगितले की, गॅस पुरवठ्यातील अडचणीमुळे अनेक कुटुंबांना वेळेवर सिलेंडर मिळत नाही. त्यामुळे स्वयंपाकासाठी पर्यायी इंधनाची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन केरोसिनचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एलपीजी सिलेंडर उशिरा मिळाल्यास नागरिकांना तात्पुरता पर्याय म्हणून केरोसिनचा वापर करता येणार आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट
केरोसिनचे वितरण वाढवण्याबाबतही नियोजन
राज्य सरकारकडून जिल्हानिहाय केरोसिनचे वितरण वाढवण्याबाबतही नियोजन करण्यात येत असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत (PDS) तसेच अधिकृत विक्रेत्यांमार्फत नागरिकांना केरोसिन उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित विभागांना यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी सिलेंडर मिळण्यासाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून केरोसिनचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू
सरकारकडून केंद्र सरकारशीही संपर्क साधून एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली. राज्यातील गॅस तुटवड्याची परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
