मुंबई. Ladki Bahin Yojana Installment: राज्यातील लाडक्या बहिणींंच्या खात्यात योजनेचे पैसे जमा व्हायला 31 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. डिसेंबर संपला तरी नोव्हेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींना हुरहुर लागली होती. अखेर वर्षाअखेर लाभार्थीं महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असून त्याच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

कितीचा हफ्ता जमा झाला?

पात्र लाडक्या बहिणींना महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर एकदम तीन महिन्याचा हफ्ता जमा होणार, असे बोलले जात होते. मात्र बुधवार 31 डिसेंबरच्या सायंकाळपासून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे. लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता. या दोन्ही महिन्यांच्या हफ्त्यासोबतच जानेवारी महिन्याचा हफ्ता देखील म्हणजे 4 हजार 500 रुपये 17 जानेवारी नंतर जमा होतील व सरकारकडून महिलांना संक्रात भेट मिळेल, असा अंदाज होता. मात्र पात्र महिलांच्या बँक खात्यात केवळ नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. दोन महिने हफ्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना वर्षाच्या सरतेशेवटी सरकराने दीड हजार रुपये देऊन खुश केलं आहे.

तीन महिन्याचे हफ्ते मिळण्याची अपेक्षा असताना केवळ एका महिन्याचे पैसे मिळाल्याने बहिणींचा काहीसा हिरमोड झाला आहे. मात्र केवायसी केल्यानंतर पहिलाच हफ्ता खात्यात आल्याने महिला खुश आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. ज्या महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी केली नाही त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. मात्र अजूनही केवायसीची लिंक सक्रीय असल्याने मुदतवाढ दिली आहे की, तांत्रिक समस्या आहे, हे सरकारकडून स्पष्ट झालेले नाही.

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचा हफ्ता जमा झाला की नाही कसे तपासायचे?

    अनेक महिलांना हफ्ता जमा झाल्याचा मेसेज तांत्रिक कारणांमुळे उशीरा येतो किंवा कधी कधी मेसेजच येत नाही. अशा वेळी खालील पद्धतींनी तुमचा हफ्ता जमा झाला की नाही ते तपासू शकता -

    • जवळच्या बँक शाखेत जाऊन बँक पासबुक प्रिंट करून बॅलेन्स तपासा.
    • मोबाईल बँकिंग / UPI - जर तुम्ही फोन पे, गुगल पे किंवा बँकेचे ॲप वापरत असाल, तर तिथे 'बँक बॅलेन्स' चेक करू शकता.
    • पैसे जमा झाल्याचा एसएमएस न आल्यास बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन बँक खात्यातील शिल्लक रक्कमेबाबत जाणून घेऊ शकता.
    • डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट पाहू शकता.
    • -इंटरनेट बॅंकिंगच्या सहाय्याने यूजरनेम व पासवर्ड टाकून शिल्लक रक्कम व व्यवहार तपासू शकता.