जेएनएन, मुंबई: राज्यातील सर्वसामान्य महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेत तब्बल 164 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. राज्यभरातील सुमारे 12 हजार भावांनी खोट्या लाभार्थ्यांच्या नावावर ई-केवायसी करून रक्कम आपल्या खात्यात वळवून घेतली.
कसा झाला घोटाळा?
माहितीनुसार, काही तंत्रज्ञान जाणकार आणि एजंटांच्या संगनमताने हजारो खोट्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यात आले.काही प्रकरणांत एकाच मोबाईल क्रमांकावरून शेकडो ई-केवायसी पूर्ण करण्यात आले.तर अनेक ठिकाणी बनावट ओळखपत्र, बनावट आधार क्रमांक आणि खोटी बँक खाती वापरण्यात आली.
या सर्व खात्यांवर योजनेतील रक्कम जमा झाल्यानंतर ती तात्काळ काढून दुसऱ्या खात्यांत वळवण्यात आली. या पद्धतीने अंदाजे 12 हजार व्यक्तींनी मिळून 164 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे.
सीबीआय चौकशीची मागणी
या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून केली जात आहे.
तर राज्य सरकारने याप्रकरणी गुन्हे शाखा आणि सायबर विभागाला तपासाची जबाबदारी सोपवली आहे. प्राथमिक अहवालानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच नेटवर्कने बनावट लाभार्थी तयार केले होते. काही ठिकाणी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताचाही संशय व्यक्त केला जातो आहे.तपास यंत्रणा संबंधित बँक व्यवहार, ई-केवायसी लॉग आणि IP अॅड्रेसची सखोल छाननी करत आहे. पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अटक होण्याची शक्यता आहे.
