जेएनएन, मुंबई. जुन्या ज्या योजना आहेत त्यांच्यात कुठेही कटोती होणार नाही, लाडक्या बहिणींना जी 50% सूट दिलेली आहे ती तशीच कायम राहील, 50 टक्के सूट दिल्यानंतर एसटीच्या उत्पादनात वाढ झालेली आहे कारण प्रवासी संख्या वाढलेली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Minister Pratap Sarnaik) दिली. तसंच, ज्येष्ठ नागरिकांना जी आम्ही सूट देतोय 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हे आम्हाला राज्य सरकारकडून अनुदान मध्ये प्राप्त होत असते, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

भाडेवाढ शिवाय पर्याय नाही

गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती ती भाडेवाढ काल मंजूर केली आहे. 1 फेब्रुवारीपासून टॅक्सी आणि रिक्षाचे पण भाडेवाढ होणार आहे. अद्याप माझ्यापर्यंत अधिकृत फाईल त्या संदर्भातली आलेली नाही. एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे. दर दिवशी 3 कोटींचा तर महिन्याला 90 कोटी तोटा सहन करावा लागतो, अशा परिस्थितीत भाडेवाढ शिवाय पर्याय नाही, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. (Pratap Sarnaik On Bus Ticket Hike)

 तीन रुपये प्रति किलो मीटर भाडेवाढ

 मी प्रधान सचिवांना सांगितलं आहे की, भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारित ही भाडेवाढ करावी. टॅक्सी आणि रिक्षाचे तीन रुपये प्रति किलो मीटर भाडेवाढ होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पीपीपी तत्त्वावर प्रकल्प 

    एमएसआरडीसी कडे 3340 एकर जागा मोक्याच्या ठिकाणी आहे. राज्यातील बस आगारांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी युरोपियन आर्किटेक्ट योजना आणली आहे. राज्यातील सर्व आगारांचा आधुनिकीकरण करण्याचं आणि राज्य शासनाकडे तेवढा निधी नसल्याने पीपीपी तत्त्वावर किंवा बीओपी तत्त्वावर हे प्रकल्प करावे. अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती की अत्याधुनिक बस स्थानक प्रत्येकाला मिळावं, प्रवाशांची सोय व्यवस्थित व्हावी यासाठी ही योजना आम्ही अंमलात आणतो आहोत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

    कंडक्टर ड्रायव्हर यांना पगार द्यायला देखील पैसे नसतात

    आमच्याकडे उत्पादनांचा स्त्रोत असल्याशिवाय सुधारणा करू शकत नाही,  मी परिवहन मंत्री पदाचा पदभार घेतल्यापासून दोन हजार कोटी देणे देण्याचे बाकी आहेत, बस कंडक्टर ड्रायव्हर यांना पगार द्यायला देखील पैसे नसतात शासनाकडे हात पसरावा लागतो, अशाप्रकारे परिवहन सेवा चालवत असताना काही प्रमाणात जबाबदारी ही प्रवाशांनी देखील घ्यायला पाहिजे. भाडे तत्वावर गाड्या घेण्याचा प्रस्ताव होता तोही मी रद्द केला. दरवर्षाला पाच हजार गाड्या म्हणजे पुढच्या पाच वर्षात 25 हजार गाड्या आल्या तर डोंगरदऱ्यांमध्ये सुद्धा बस पोहचू शकेल, असं सरनाईक म्हणाले.

    पाच हजार इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी

    राज्यामध्ये अशा अद्ययावत चार्जिंग स्टेशन निर्माण झालेले नाहीत. या बॅटऱ्या लागतात त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाहीत. पाच हजार इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी केली होती मात्र दोन वर्षात 5000 गाड्या देतो असे सांगितले असून देखील आतापर्यंत साडेचारशे गाड्या आलेले आहेत. पुढच्या काळामध्ये जे काही सुधारणा करता येईल ते सुद्धा आमच्या डिपार्टमेंट करून करण्यात येईल, असं ते म्हणाले.

    त्या मागणीला आमचा पाठिंबा

    बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ही मागणी फार दिवसापासून केलेली आहे. आम्ही सर्व शिवसैनिक आहोत. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आणि त्यांनी केलेल्या कामावर आम्ही निवडून येतो, या देशाचे हिंदुहृदय सम्राट म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांना भारतरत्न द्यावा ही मागणी महत्त्वाची आणि मोठी आहे. यामध्ये राजकारणात सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्रित येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा ही जर मागणी कोणी करत असेल तर त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.