जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकाराच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासन निर्णयानुसार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

या निर्णयानुसार, सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेला देय होणारे ऑगस्ट महिन्याचे वेतन, तसेच निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी म्हणजे 26 ऑगस्ट, 2025 रोजी अदा करण्यात येणार आहे.   

यावर्षी गणेशोत्सव 27 ऑगस्ट, 2025 पासून सुरू होत असल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांना सण साजरा करताना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुंबई वित्तीय नियम, 1959 मधील नियम क्रमांक 71 आणि महाराष्ट्र कोषागार नियम, 1968 च्या खंड 1 मधील नियम क्रमांक 328 मधील तरतुदी तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात आल्या आहेत. 

सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी (DDO) वेतन आणि निवृत्तीवेतन देयके वेळेवर सादर करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. 

हा निर्णय जिल्हा परिषद, अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी आणि अकृषी विद्यापीठे, तसेच त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना देखील लागू होईल.