जेएनएन, मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत टोल माफ करण्याची घोषणा केली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

मुंबई-गोवा, मुंबई-बेंगळुरू महामार्ग आणि पीडब्ल्यूडी/एमएसआरडीसी रस्त्यांवर टोल-मुक्त प्रवासासाठी "गणेशोत्सव 2025- कोकण दर्शन" हा विशेष पास जारी केला जाईल, ज्यामुळे लाखो भाविकांचा प्रवास सुलभ होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

296 विशेष रेल्वे सोडण्यात येणार

गणेश उत्सव काळातील गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 44 अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. गणेश उत्सव काळात 296 विशेष गाड्या प्रवाशांच्या सेवेत लवकरच धावणार आहेत. हजारोंच्या संख्येने मुंबईकर गणेशोत्सवात गावी जात असल्यामुळे त्यांच्यासाठी 296 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वेंमुळे त्याचा प्रवास सुखकारक होणार आहे.