मुंबई. India Pakistan Bordercha Raja : मुंबईतील विद्याविहार येथील गणपतीची मूर्ती, भारत-पाकिस्तान बॉर्डरचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेली गणेशमूर्ती नियंत्रण रेषेवर (LoC) तैनात असलेल्या सैनिकांना आनंद देण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ गावात दाखल झाली आहे. किरणबाला ईशर - ज्यांना ‘ईश्वर दीदी’ म्हणून ओळखले जाते - यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवला जात आहे.
दर गणेशोत्सवात, सैनिक दर्शन घेऊ शकतील आणि उत्सव साजरा करू शकतील म्हणून त्या मुंबईतील विद्याविहारहून भारत-पाक सीमेवर गणपतीची मूर्ती घेऊन जातात.
हा प्रवास जम्मूपर्यंत ट्रेनने होतो. त्सुयानंतर डोंगराळ रस्त्यांनी पूंछला जाण्यासाठी सुमारे 600 किमीचा प्रवास रस्तेमार्गाने सुरू होतो. “आम्ही मूर्ती घेऊन नियंत्रण रेषेवर पोहोचलो आणि मंडळ सजवले. दररोज, आम्ही सैनिकांसोबत दोनदा आरती करतो आणि त्यांच्यासाठी प्रसाद तयार करतो. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी आम्ही दरवर्षी फक्त सैनिकांसाठी मूर्ती येथे आणतो,” ईशर दीदी यांनी मिड-डेला सांगितले.
6.5 फूट उंचीच्या या मूर्तीच्या बॅकग्राउंडला अष्टविनायक गणेश मूर्ती बनवल्या आहेत. दरवर्षी सैन्य या उत्सवाला परवानगी देते आणि उत्सवांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. आम्ही जम्मू रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रेनने प्रवास केला आणि तिथून लष्करी कर्मचाऱ्यांसह वाहनांनी आम्हाला पूंछपर्यंत नेले, असे इशर म्हणाल्या. उत्सवांव्यतिरिक्त, ईशर दीदी घरी येणाऱ्या मुलांनाही सहभागी करून घेतात. आम्ही ऑपरेशन सिंदूरवर विद्याविहारमधील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची चित्रे, भारतीय ध्वजांसह, सैनिकांना दिली जातात, असे त्यांनी सांगितले.

बॉर्डरच्या राजासोबत विद्याविहारमधील विद्यार्थी -
काय आहे यामागील रंजक कथा -
किरणबाला ईशर नावाची एक महिला जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ गणेश उत्सव साजरा करण्यासाठी भारत-पाकिस्तान बॉर्डर चा राजा’ नावाची गणपतीची मूर्ती दरवर्षी घेऊन जातात. किरणबाला ईशर, ज्यांना ‘ईश्वर दीदी’ म्हणूनही ओळखले जाते. ‘प्रोग्रेसिव्ह नेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या बॅनरखाली ‘ईश्वर दीदी’ हा उपक्रम राबवतात. सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गणेश उत्सव साजरा करता यावा यासाठी पूंछमध्ये गणपतीची प्रतिष्ठापणा करतात. त्यांनी सांगितले की, त्यांची व त्यांच्या कुटुंबाची गणपती बाप्पावर विशेष श्रद्धा आहे. तसेच त्यांच्या कुटूंबाला लष्कराची पार्श्वभूमी आहे. गेल्या 6 वर्षापासून त्या हा उपक्रम राबवत आहेत.