जन्सी, मुंबई. Mumbai Latest News: नुकतेच वक्फ दुरुस्ती विधेयक हे लोकसभेत पारित झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये. म्हणून मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत मुंबई पोलिसांनी एका महिन्यासाठी ड्रोन, रिमोट-कंट्रोल्ड मायक्रोलाईट विमाने, पॅरा ग्लायडर्स आणि हॉट एअर फुगे उडवण्यास बंदी घातली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बंदी 4 एप्रिल ते 5 मे पर्यंत लागू 

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत जारी केलेला प्रतिबंधात्मक आदेश 4 एप्रिल ते 5 मे पर्यंत लागू राहील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवादी आणि समाजकंटक…

आदेशानुसार, दहशतवादी आणि समाजकंटक ड्रोन, रिमोट-कंट्रोल्ड मायक्रोलाईट विमाने, पॅरा ग्लायडर्सचा वापर त्यांच्या हल्ल्यांमध्ये आणि व्हीव्हीआयपींना लक्ष्य करण्यासाठी करू शकतात, ज्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते, तसेच सार्वजनिक मालमत्तेचा नाश होऊ शकतो आणि मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे उडत्या वस्तूंद्वारे होणारे संभाव्य खराब वातावरण रोखण्यासाठी शहरातील अशा घटकांच्या हालचालींवर काही निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे, ज्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे आदेशात नमूद केले आहे.

    कोणत्याही उड्डाण क्रियाकलापांना परवानगी नाही 

    त्यानुसार, मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात ड्रोन, रिमोट-कंट्रोल्ड मायक्रोलाईट विमाने, पॅराग्लायडर्सच्या कोणत्याही उड्डाण क्रियाकलापांना परवानगी दिली जाणार नाही, पोलिसांच्या हवाई देखरेखीशिवाय किंवा डीसीपी (ऑपरेशन्स) यांच्या विशिष्ट परवानगीशिवाय परवानगी मिळणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

    नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

    आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय न्याय संहिताच्या कलम 223 (सार्वजनिक सेवकाने जारी केलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत शिक्षा केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.