जेएनएन, मुंबई: राज्यात शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली असून या अंतर्गत विविध विभागांमार्फत आतापर्यंत 411 कामांसंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली 372 कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत 85 टक्के कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. सर्व विभागांनी येत्या 1 मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने शंभर दिवस कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
1 मे रोजी सर्व विभागांनी…
100 दिवसांसाठीचा कृती आराखडा कार्यक्रम विभागांनी गांभीर्याने यशस्वी केला आहे. अनेक विभागांनी यामध्ये उत्तम काम केले आहे. नागरिकांना या माध्यमातून उपयुक्त आणि तत्पर सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शंभर दिवसांसाठी कार्यक्रमाचा कालावधी 15 दिवस वाढविण्यात आला आहे. येत्या 1 मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर विभागांनी संकल्पित केलेली कामे व पूर्ण झालेली कामे याची माहिती उपलब्ध करुन द्यावे. काही कार्यवाही अपूर्ण राहिली असतील तर त्याची कारणे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
निधीचा सुयोग्य वापर करण्यास प्राधान्य द्यावे
विभागांनी गतीमानतेने लोकोपयोगी कामे गुणवत्तेसह आणि कालमर्यादेत पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी विभागांनी आपल्यास्तरावर यंत्रणा कार्यान्वित करावी. उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी तांत्रिक, प्रशासकीय आणि इतर अनुषंगिक बाबींची तातडीने पूर्तता करावी. विभागांनी उपलब्ध निधीचा सुयोग्य वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
हेही वाचा - Orange Alert In Maharashtra: राज्यात आज-उद्या गारपीट होणार, काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन
26 विभागांच्या कार्यवाहीचा आढावा
बैठकीत एकूण 26 विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांचे 938 मुद्द्यांपैकी 411 मुद्द्यांवर (44%) पूर्णतः काम झाले आहे. तसेच, 372 मुद्दे (40%) अंतिम टप्प्यात असून ते निश्चित वेळेत पूर्ण होतील. 155 मुद्दे प्रगतीपथावर आहेत. या कामांच्या पूर्ततेबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित विभागांनी दिली. त्यासाठी त्यांना 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.
शासनाप्रती जनतेमध्ये चांगला दृष्टीकोन
शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी गतीमान काम करुन लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अनुभव जनतेला दिला आहे. त्यातून शासनाप्रती जनतेमध्ये चांगला दृष्टीकोन तयार होत आहे. शंभर दिवस कार्यक्रम ही संकल्पना अंत्यत उपयुक्त असून जिल्हास्तरावरही चांगला बदल होत आहे. अनेक प्रकल्प, मोठी कामे शंभर दिवसाच्या कालावधीत साकारली आहेत. त्यासोबत अनेक विभागांच्या सेवा ऑनलाईन झाल्या आहेत, त्याचा जनतेला विशेष लाभ होत आहे. या सर्व उत्तम कामगिरीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विभागांचे अभिनंदन केले.