जेएनएन, मुंबई.Weather Update Today: गेल्या काही दिवसापासून राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस पावसाचा ही स्थिती कायम असणार आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार कोकण विभागात दिनांक चार एप्रिल पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज 3 एप्रिल ते सहा एप्रिल दरम्यान बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात आज तीन व चार एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज तीन एप्रिल रोजी अकोला, अमरावती, चंद्रपूर येथे तर दिनांक 4 एप्रिल रोजी गडचिरोली येथे मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट व ताशी 50 ते 60 किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आज दिनांक 3 एप्रिल रोजी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे व पुणे जिल्ह्याचा घाट विभाग कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात सातारा व सातारा जिल्ह्याचा घाट विभागात सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ येथील 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरासाठी हवामानाचा अंदाज -आजपासून पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहुन मेघ-गर्जना विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.