जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक मंगळवार, 1 जुलै रोजी होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 जून
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक 1 जुलै रोजी होणार असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेत भाजपचे सर्वाधिक सदस्य असूनही हे पद एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.
उपसभापतीपद रिक्त असल्याने हे पद भरण्यासाठी विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांना निर्धारित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार असून, त्यानंतर सभागृहात मतदानाद्वारे उपसभापतीची निवड केली जाईल. मात्र, एखाद्या एकमेव उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्यास बिनविरोध निवडीचीही शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनाकडून निलम गोऱ्हे यांचे नाव अग्रेसर असून अजित पवार यांची राष्ट्रवादी ही उपसभापती पदासाठी आग्रही आहे.
सध्या विधान परिषदेत संख्याबळाच्या दृष्टीने महायुती आघाडीवर असल्याने उपसभापतीपदावर महायुतीचाच उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. तरीही विरोधक कोणता उमेदवार मैदानात उतरवतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उपसभापती हे विधान परिषदेच्या कामकाजातील महत्त्वाचे घटनात्मक पद असून, सभापती अनुपस्थित असताना सभागृहाचे कामकाज चालविण्याची जबाबदारी उपसभापतींवर असते. सभागृहातील चर्चा, प्रश्नोत्तरांचा तास आणि विविध विधेयकांवरील कामकाज सुरळीत पार पाडण्यात उपसभापतींची महत्त्वाची भूमिका असते.
1 जुलै रोजी होणाऱ्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो आणि विरोधक काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
