पुणे/मुंबई: पुणे शहरात रविवारी पहाटे एका कंपनीची बस खोल दरीत कोसळल्याने दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि 18 जण जखमी झाले. 'सीप्झ' (SEEPZ) कंपनीचे कर्मचारी राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी एका खासगी मिनीबसने प्रवास करत होते. ही बस 40 फूट खोल दरीत कोसळली.

हा ग्रुप निर्यातीसाठी दागिने बनवणाऱ्या शिमायरा ज्वेलरीमध्ये काम करत होता. पहाटे सुमारे 1:50 वाजता पाबे घाटावरील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याकडेचे रेलिंग तोडून दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातील जवळपास २० जणांचा समूल राजगड किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी आले होते. रात्रीच्या सुमारास त्यांची खासगी बस हवेली आणि वेल्हा तालुक्यात जोडणाऱ्या पाबे घाटात पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट घाटातील दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की मिनी बसचा पार चक्काचूर झाला.

पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

अपघातात ठार झालेले दोन प्रवासी, विले पार्ले येथील विश्वास सतीम (25) आणि कांदिवली पश्चिम येथील ध्वनी ठक्कर (23), यांना दरीतून बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्ध होते आणि नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. हवेली आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवत जखमींना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढलं.

निष्काळजीपणामुळे आणि बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी जोगेश्वरी येथील चालक संदीप गायकवाड (४०) याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.