जेएनएन, मुंबई: साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर (Dr. Sampada Munde Doctor Suicide Case) चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांनी आजपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सातारा जिल्हातील फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू झाल्याने राज्यभर वैद्यकीय क्षेत्रात संताप उसळला आहे. या मृत्यूच्या तपासात चौकशी धीम्या गतीने व चुकीच्या दिशेने चालल्याचा आरोप डॉक्टर संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे.
आंदोलनाचा निर्णय
राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांनी एकत्र येऊन रविवारी मेणबत्ती मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला. या संघटनांमध्ये माई (महिला डॉक्टर संघटना), अस्म (आंतरवासिता डॉक्टर संघटना), एमएसआरडीए (वरिष्ठ निवासी डॉक्टर संघटना) या प्रमुख संघटनांचा समावेश होता.
प्रमुख मागणी
- फळटण प्रकरणाची न्याय्य, निष्पक्ष आणि जलद चौकशी करावी.
- दोषींवर गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करावी.
- डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कडक कायदेशीर यंत्रणा उभी करावी.
- महिला डॉक्टरांच्या कार्यस्थळी सुरक्षित वातावरणाची हमी द्यावी.
आरोग्य सेवा विस्कळीत
आंदोलनात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई या प्रमुख शहरांतील वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
सर्व रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, केवळ आपत्कालीन सेवा सुरू राहणार आहे.
जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर 7 नोव्हेंबरपासून बाह्यरुग्ण सेवांवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. सोबतच 14 नोव्हेंबरपासून सर्व आपत्कालीन सेवा बंद करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
