जेएनएन, मुंबई: कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या उपस्थितीत इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, औंध यांच्यात औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार

हा सामंजस्य करार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील नवा अध्याय आहे. या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. आरोग्य म्हणजे केवळ कोणत्याही आजारावर उपचार नसून प्रतिबंध, जनजागृती, शिक्षण आणि सेवा या चार घटकांचा योग्य समन्वय आहे. या केंद्राच्या स्थापनेतून हे ध्येय साध्य होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) ही संस्था देशभरातल्या दंतवैद्यांच्या सशक्त नेटवर्कमुळे अगदी गावखेड्यात दातांच्या आरोग्याविषयी जागृती करत आहे,असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी डेंटल असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले.