जेएनएन, मुंबई: महाविकास आघाडी आणि मनसेकडून ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकत्र आले. या मोर्चातून  सत्ताधारी भाजप सरकारवर आणि मतदारयादीतील गैरव्यवहारांवर गंभीर आरोप केले.

आशिष शेलारांचा जोरदार पलटवार 

मोर्चातील भाषणांमध्ये भाजपवर मतदार याद्या बदलून निवडणुकीवर परिणाम घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार पलटवार केला आहे.

‘मनसे आता व्होट जिहाद करत आहे’

पत्रकार परिषद घेऊन शेलार म्हणाले “राज ठाकरे आणि त्यांची मनसे आता व्होट जिहाद करत आहेत. हा सत्याचा मोर्चा नसून मतांसाठीचा जिहाद आहे. राज ठाकरे यांनी सत्य सांगायचं असेल तर दिल्ली ते गल्लीपर्यंत जे पाप पडलंय त्याचंही बेनकाब करावं.”

“जे सत्य आहे ते आम्ही मांडणारच. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होट बँक राजकारण करणं चुकीचं आहे. निवडणुका स्वच्छ झाल्या पाहिजेत, आमचीही तीच इच्छा आहे.”

    राज ठाकरे यांनी मोर्चातून मांडलेले आरोप म्हणजे केवळ सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करण्याचा राजकीय डाव असल्याची टीका  शेलार यांनी केली. “राज ठाकरे यांनी खरोखर पारदर्शकतेची मागणी करायची असेल तर निवडणूक आयोगासमोर पुरावे ठेवावेत, रस्त्यावर मोर्चा काढण्याऐवजी कायदेशीर मार्ग निवडावा,” असेही शेलार यांनी सांगितले. “राज ठाकरे यांनी व्होट जिहाद करणे थांबवावे. महाराष्ट्रातील जनता आता अशा राजकारणाला कंटाळली आहे.”अशी टीका ही शेलार यांनी केली.