जेएनएन, मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात आरोप करणाऱ्या महिला आणि रिपोर्टर तुषार खरात यांच्यासह तीन जणांना अटक केले आहे, या आरोपीशी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचा संबंध होता, असे पुरावे आढळले आहेत, असा दावा अंतिम आठवड्याच्या प्रस्तावामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

विधानसभेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…

  • “एखाद्याला आयुष्यातून उठवायच्या हेतूने राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. गोरेंसंदर्भातली केस 2016 मध्ये नोंद झाली, 2019 ला संपली. ते तेव्हा सत्तापक्षातही नव्हते. पण त्यानंतर अचानक हे उकरून काढण्याचा प्रकार झाला”, असं फडणवीस म्हणाले.
  • “मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो. एखादी व्यक्ती अशा स्थितीत गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करते. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार केली. त्यानंतर सापळा रचला. सगळं संभाषण रेकॉर्ड झालं. संभाषणाच्या अनेक क्लिप आहेत. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर त्यांनी सापळा रचला. प्रत्यक्ष रोख रक्कम घेताना आरोपीला पकडण्यात आलं. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता”, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा - Anna Bansode: विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल, बिनविरोध निवड होणार

  • हे एक प्रकारचं नेक्सस होतं. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक झाली आहे. एक स्वत: ती महिला आहे. दुसरा हा पत्रकार तुषार खरात आहे आणि तिसरा अनिल सुभेदार नावाचा व्यक्ती आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला होता. याचे सगळे पुरावे सापडले आहेत. यांचं व्हॉट्सअॅप संभाषण सापडलं आहे. यांचे 150 फोन सापडले आहेत. यांनी कट कसा रचला हे समोर आलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात”, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 
  • “प्रभाकर देशमुख यात थेट 100 वेळा या तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. व्हिडीओ त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांचंही उत्तर आलं आहे. पण त्याहीपेक्षा मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांना झाले आहेत याचं. जयकुमार गोरेंचे जे व्हिडीओ झालेत, ते आरोपींनी या दोघांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल, असं फडणवीस म्हणाले.
  • पण हे चाललंय काय? आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत. अशा प्रकारे कुणाला जीवनातूनच उठवण्याचा कट रचला जात असेल तर हे चुकीचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पहाटे अग्नीतांडव, बस जळून खाक