जेएनएन, मुंबई. भाजपने अकोट नगरपरिषदेत एमआयएमसोबत तर अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत युती केल्याची (BJP Congress Alliance) माहिती समोर आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला देत असलेल्या मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते संतापलेले दिसून आले.

अकोट नगरपरिषदेत काय झालं?

अकोट नगरपरिषदेत भाजपने चक्क एमआयएमला सत्तेसाठी सोबत घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. बहुमतासाठी भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. या अकोट विकास मंचमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा एमआयएम, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती सहभागी झालीय. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

अंबरनाथ नगरपरिषदेत काय झालं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात शिंदेंना भाजपाने (BJP) मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत, शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आली पण बहुमतापासून दूर राहिली आहे. कारण, भाजपाने चक्क काँग्रेससोबत (Congress) हातमिळवणी केली आहे. त्यामुळे सर्वात विविध चर्चांना उधाण आले आहे. चला सविस्तर समजून घेऊया… 

    अकोट आणि अंबरनाथ प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थानिक पातळींवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेससोबतच्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही.  स्थानिक पातळीवर जरी हे झालं असेल तर चुकीचचं आहे. ज्याने कोणी ही युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.