जेएनएन, मुंबई. उद्या शिव जयंती उत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्तानं प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात येत आहे.  शिव जयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्त प्रवीण पवार शांतता बैठक घेतली आहे. तर ठाण्यातील शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शोभायात्रेनंतर शिवप्रेमींशी दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.

शांतता समितीची बैठक

छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व शिवजयंती आनंदात साजरी करण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत, सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ठाणे शहरातून निघणार पदयात्रा

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने ठाणे शहरात उद्या 6 कि.मी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचे 'जय शिवाजी जय भारत' असे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. या पदयात्रेत 5 ते 6 हजार युवक सहभागी होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आज झालेल्‌या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते.

    असा असेल पदयात्रेचा मार्ग

    ठाणे शहरातून सकाळी 7.30 वा. शिवसमर्थ शाळा पटांगण, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे येथून पदयात्रा बाहेर पडून मारोतराव शिंदे तरणतलाव, दत्त मंदिर घाट, प्रभात सिनेमा सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रंगो बापूजी गुप्ते चौक, टेंभीनाका, कोर्टनाका, सेंट्रल मैदान, ठाणे जिल्हा कारागृह, जी.पी.ओ, सिव्हील हॉस्प‍िटल, सिग्नाँग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, अल्मेडा चौक, महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी प्रशांत कॉर्नर, आराधना टॉकीज चौक, हरिनिवास सर्क, मल्हार सिनेमा सर्कल, गोखले रोड, राम मारुती रोड प्रवेश, पु.ना. गाडगीळ चौक, तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे समाप्त होणार आहे. 

    पंतप्रधान साधणार विद्यार्थांशी संवाद

    पदयात्रेनंतर शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत, असं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितलं.