जेएनएन, नवी दिल्ली. नुकतेच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे विजयी झाले आहेत. लवकरच ते उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील. त्यापूर्वी सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा दिला आहे. 

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण?

भारताचे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन त्यांची निवड झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारताच्या राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केले आहे, अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.

आचार्य देवव्रत यांच्याविषयी माहिती

  • हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.
  • ते 2019 पासून गुजरातचे  राज्यपाल म्हणून काम करत आहेत.
  • याआधी ते 2015 ते 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

हेही वाचा - नेपाळच्या हंगामी पंतप्रधानपदाबाबत ट्विस्ट, सुशीला कार्की यांच्या जागी  Gen-Z ने 'या' नेत्याच्या नावाचा दिला प्रस्ताव

    उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल

    उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन (C P Radhakrishnan) यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. विरोधकांनी त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उभे केले होते. रेड्डी यांना फक्त 300 मते मिळू शकली. निवडणुकीत बरेच क्रॉस व्होटिंग झाल्याचा दावा भाजपने केला आहे.