मुंबई. BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस बाकी असताना दोन्ही पक्षांमध्ये अंतिम एकमत झाले असून, महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

अमित साटम यांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप 137 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 90 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनंतर आणि बैठकीनंतर अखेर हा तोडगा निघाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही प्रभागांवर दोन्ही पक्षांकडून जोरदार दावा करण्यात येत होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यातही अनिश्चिततेचे वातावरण होते. मात्र वरिष्ठ पातळीवरील हस्तक्षेप आणि सलग बैठकांनंतर अखेर जागावाटप निश्चित करण्यात आले.

जागावाटप निश्चित झाल्याने आता दोन्ही पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांची मोठी धावपळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अनेक इच्छुकांनी आधीच तयारी केली असून, अधिकृत याद्या जाहीर होताच अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.

महायुतीकडून एकसंघपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप–शिवसेना महायुतीने रणनीती आखली असून, आता प्रचारावर आणि संघटनात्मक तयारीवर भर दिला जाणार आहे.