मुंबई. Saamana Agralekh On Mumbai Mayor: कृपाशंकर यांचे ‘‘मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल’’ हे वक्तव्य हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे, पण नकली शिवसेना त्यावर लाचार होऊन सारवासारव करते आहे. ‘‘मुंबईच्या महापौरांविषयी कृपाभैयाने केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे,’’ असे हे लाचार म्हणत आहेत. (थोडक्यात काय तर आम्ही आतमध्ये ‘शेपटा’ घातला आहे. तो काढता येत नाही.) अरे, थुत तुमच्या जिनगानीवर! असा हल्लाबोल शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
काय म्हणलं आहे अग्रलेखात -
मुंबई भावनिक व भौगोलिक, ऐतिहासिकदृष्टय़ा मराठी माणसाचीच आहे आणि मुंबईवर अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न केला तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. फक्त पैशांनी मुंबईवर ताबा मिळवता येणार नाही हे भाजपच्या ‘कृपाशंकर’ छाप नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाचा इतिहास समजून घ्यावा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी तेव्हा 106 बलिदाने झाली. त्या बलिदानाची परंपरा यापुढेही सुरूच राहील. कृपाशंकर यांचे ‘‘मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल’’ हे वक्तव्य हीच भाजपची अधिकृत भूमिका आहे, पण नकली शिवसेना त्यावर लाचार होऊन सारवासारव करते आहे. ‘‘मुंबईच्या महापौरांविषयी कृपाभैयाने केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे,’’ असे हे लाचार म्हणत आहेत. अरे, थुत तुमच्या जिनगानीवर!
भारतीय जनता पक्षाने कृपाशंकर यांच्या मुखातून आपली मळमळ बाहेर काढली आहे. महापालिका निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की, त्यातून मुंबईचा महापौर उत्तर भारतीय समाजाचा असेल, असे हे कृपाशंकर म्हणाले. कृपाशंकर यांच्या वक्तव्याने मुंबईबाबतचे भाजपचे मनसुबे उघड झाले आहेत.
कृपाशंकर हे भाजपच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातील जौनपूर लोकसभा मतदारसंघात लढले व त्यांचा दारुण पराभव उत्तर भारतीयांनी केला. म्हणजे जे उत्तर भारतात पराभूत झाले ते मुंबईत उत्तर भारतीय महापौर करायला निघाले आहेत. कृपाशंकर यांनी भाजपच्या तंगड्या भाजपच्याच गळ्यात बांधल्या आहेत. मुळात या निवडणुकीत भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे मुंबईत मराठी-अमराठी वादाची ठिणगी टाकून ते निवडणुका लढू इच्छितात. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई अशा भागांत उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत.
भाजप-मिंध्यांचे शंभर बाप उतरले तरी -
आदित्यनाथ महाराज, केशव मौर्य, ब्रजेश पाठक, सम्राट चौधरी, मैथिली ठाकूर, मध्य प्रदेश, राजस्थानचे भाजपचे मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या फौजा आता भाजप मुंबईत उतरवणार आहे ते फक्त महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी महापौर होऊ नये यासाठीच. एवढे असूनही महाराष्ट्राचे मराठी मीठ खाणारे सरकार आणि त्यांचे मिंधे या कटबाजीवर तोंड उघडत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन सत्ता भोगणारी अमित शहांची बुटचाटी सेना तर कृपाशंकर यांच्या मराठीद्वेष्टय़ा वक्तव्यावर मूग गिळून बसली आहे. कृपाशंकरच काय, भाजप-मिंध्यांचे शंभर बाप उतरले तरी मुंबईशी मराठी माणसाचे असलेले नाते तोडता येणार नाही. मुंबई भावनिक व भौगोलिक, ऐतिहासिकदृष्टय़ा मराठी माणसाचीच आहे आणि मुंबईवर अमराठी महापौर लादण्याचा प्रयत्न केला तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याप्रमाणे भडका उडाल्याशिवाय राहणार नाही,असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
