जेएनएन, मुंबई. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देत पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी दिलेला “युवांना संधी” देण्याचा शब्द भाजपने प्रत्यक्षात उतरवला असून, मुंबईत भाजपच्या एकूण उमेदवारांपैकी तब्बल 27 टक्के उमेदवार हे 40 वर्षांखालील आहेत.
भाजपच्या यादीकडे पाहिल्यास युवकांना मानाचं स्थान देण्यात आल्याचं स्पष्टपणे दिसतं. 20 ते 30 वयोगटातील 9 तरुणांना थेट महापालिकेच्या रणांगणात उतरवण्यात आलं आहे. याशिवाय 30 ते 40 वयोगटातील 27 उमेदवार रिंगणात असून, एकूण 40 वर्षांखालील 36 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
वयोगटानुसार उमेदवारांची रचना पाहता,
- 20 ते 30 वयोगट : 9 उमेदवार
- 30 ते 40 वयोगट : 27 उमेदवार
- 40 ते 50 वयोगट : 43 उमेदवार
- 60 वर्षांवरील : केवळ 10 उमेदवार
यातून भाजपने अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे 60 वर्षांवरील उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवत, पक्षाने पुढील पिढीच्या नेतृत्वावर भर दिल्याचं संकेत मिळत आहेत.
भाजप नेतृत्वाकडून वारंवार “नवीन चेहरे, तरुण नेतृत्व आणि कार्यक्षम कार्यकर्ते” यावर भर दिला जात होता. मुंबई महापालिकेच्या उमेदवार यादीतून हा दावा प्रत्यक्षात उतरला आहे.तरुण उमेदवारांमुळे प्रचारात नवचैतन्य येईल आणि शहरी मतदारांशी थेट संवाद साधण्यास मदत होईल, अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्त केली जात आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा हा युवकांवर आधारित प्रयोग किती यशस्वी ठरतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
