जेएनएन, मुंबई: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स तसेच गेट्स फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्या दोघांमध्ये प्रशासनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या संभाव्य वापराबाबत चर्चा झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही भेट येथील सरकारी अतिथीगृह 'सह्याद्री' येथे झाली, असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाऊंडेशने सहकार्य करावे

महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि बिल गेट्स यांची पहिल्यांदाच भेट होत असून याचा आनंद असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाऊंडेशने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यात एआयच्या वापरातून ऊसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

हेही वाचा - Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरण तापले, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन

शेतकऱ्यांना कमी खर्चात वीज उपलब्ध

शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी 2022-23 पासून सोलरचा वापर करण्यात येत आहे. 30 टक्के वीज निर्मितीमधून आता 52 टक्क्यांपर्यंत सोलरमधून वीजनिर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात वीज उपलब्ध होत आहे. त्यांना 24 तास वीज देण्यासाठी विजेचे सर्व फिडर सोलरद्वारे करण्याचे नियोजन असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बिल गेट्स यांना दिली. 

    25 लाख लखपती दीदीसाठीही भागीदारी

    महिला सबलीकरण आणि स्वयंरोजगारासाठी 25 लाख महिला लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, शिवाय गरीब आणि गरजू महिलांना राज्य शासन महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून 1500 रूपये देत असल्याची माहिती दिली. या उपक्रमातही सहभाग घेण्यास मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशन तयार असल्याचेही बिल गेट्स यांनी सांगितले. महिलांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार डिजिटल करण्यासाठी सहकार्य करण्याची गेट्स यांनी तयारी दर्शवली.