जेएनएन, मुंबई. Disha Salian Latest News: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची 'सीबीआय'कडून सखोल व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, या मागणीसाठी आज शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसरात फलक झळकावत मूक आंदोलन केले. या हत्येत दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आहे. ही अतिशय गंभीर बाब दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आंदोलना दरम्यान केली.  

सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का?

दिशा सालियन हिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव येत आहे. सालियन कुटुंबाला कोणी त्रास दिला का, दबाव टाकला का याची चौकशी व्हायला हवी, असे शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या. या प्रकरणाला कोणताही राजकीय रंग दिलेला नाही. पाच वर्ष न्याय न मिळाल्याने दिशा सालियन हीचे वडील न्यायालयात गेल्याचे आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या.

डोक्यावरही कुठे जखम होत नाही?

त्या पुढे म्हणाल्या की, दिशाच्या वडिलांनी ही हत्याच असल्याचा संशय व्यक्त करताना, एखाद्या व्यक्तीची बॉडी 14 व्या मजल्यावरून पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही, डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा. 14 व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?”, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

    दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केलाय

    आम्ही कोणावरही आरोप केलेले नाहीत तर त्या दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केलाय. त्यामागे निश्चित काही कारणं किंवा त्यांची माहिती असेल. आधीची काही पार्श्वभूमी असेल. आमचे एवढेच म्हणणे आहे की त्या दुर्दैवी वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. सीबीआयकडे हे प्रकरण पुन्हा सोपवावे व नव्याने चौकशी करावी, अशी मागणी आमदार डॉ. कायंदे यांनी केली.

    हेही वाचा - एअर न्यूझीलंड आणि एअर इंडिया यांच्यात सामंजस्य करार:सुरु होणार भारत-न्यूझीलंड थेट विमानसेवा 

    त्यांना नजर कैदेत ठेवलं होतं का

    माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून त्या तरुणीच्या वडिलांवर दबाव आणला, त्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे, सतत खोटी माहिती त्यांना का देण्यात आली, जे पुरावे देण्यात आले तेच खरे आहेत हे त्यांनी मानावं यासाठी त्यांना नजर कैदेत ठेवलं होतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर किशोरी पेडणेकर यांना द्यावी लागतील, असे त्या म्हणाल्या.