जेएनएन, ठाणे. Thane Municipal Corporation election : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत युतीबाबतचा निर्णय आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या युतीबाबतचा सर्व निर्णय घेण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असल्याची माहिती  समोर आली आहे. त्यामुळे ठाणे मनपात युती होणार की शिंदे सेना स्वबळावर लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप आणि शिंदे सेना यांच्यात युती झाली, तर जागा वाटप हा सर्वात मोठा पेच ठरणार आहे. ठाणे महानगरपालिका ही एकनाथ शिंदेंची राजकीय कर्मभूमी मानली जाते. गेल्या दोन दशकांपासून ठाण्यात शिंदे गटाची मजबूत पकड आहे. मात्र, भाजपला ठाण्यातील काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये जागा दिल्यास स्थानिक शिवसैनिक नाराज होऊ शकतात. या नाराज उमेदवारांपैकी काही जण पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाण्यात शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नगरसेवक आणि पदाधिकारी हे गेल्या काही महिन्यांपासून युतीच्या चर्चेमुळे संभ्रमात आहेत. भाजपला अधिक जागा दिल्यास गेल्यास स्तरावर असंतोष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पक्षांतर्गत संतुलन राखण्यासाठी आणि स्थानिक नेत्यांच्या भावना लक्षात घेऊन युतीबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आला आहे.